रस्त्यावरून चालताना डोळे आकाशाकडे उंचावले आणि एक पक्षी मनमुरादपणे बागडत होता तेव्हा मनात एक विचार डोकावून गेला. ह्याला नसतील का काही जबाबदाऱ्या.!! मग एक संवाद सुरू झाला. का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
सकाळी उठून सगळं आवरून पैसे कमवण्यासाठीच्या लावाव्या लागतात का तुला हजेऱ्या.!!
का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
घरात मोठं असताना लहानांची उजळणी आणि मोठ्यांची कान उघडणी ह्यात होतात का रे तुझ्या वाऱ्या.!!
का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
ठेवले जातात का तुझ्यावर अपेक्षांचे थर आणि कोलमडतात का कधी तुझ्या स्वतःबद्दलच्या महत्त्वाकांक्षा साऱ्या.!!
का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
आधी लहान घर, लहान गाडी , लहान पगार आणि नंतर मोठं घर, मोठी गाडी अन मोठा पगार अश्याच वाढत असतात का तुझ्या प्रगतीच्या दोऱ्या..!!
का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
आधी आजीचा नातू, मग आई – बाबांचा मुलगा, नंतर बायकोचा नवरा, आत्ता मुलीचा बाप असाच असतो का तुझापण प्रवास आणि तूपण अनुभवतोस का नात्यांमधील कधी वर जाणाऱ्या तर कधी खाली येणाऱ्या भावनिक पायऱ्या.!!
का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
आकाश कधी निरभ्र, कधी दाटलेले, कधी पिवळसर, कधी अंधुक , कधी इंद्रधनुष्याच्या रंगाने रंगलेले अगदी माणसांच्या भिन्न भावनांसारखे, ह्या भिन्न भावनांतून तुलासुध्दा ओळखाव्या लागतात का दुसऱ्यांच्या आकाशमयी मनातील भावना कोऱ्या.!!
का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या पेलून, एकमेकांचा आधार घेऊन उंच भरारी घेण्याच्या तयारीत आहे तेव्हा तू असाच मनमुराद बागडत रहा आणि झेप घेत रहा. तुला मुक्तपणे फिरताना बघून मिळणारी प्रेरणा अनेकांना स्फूर्ती देणारी आहे. ह्याच प्रवासात कधी प्रत्यक्ष भेट झाली तर नक्की विचारेन,
का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या?
ही पोस्ट त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जी जबाबदारी अनुभवत आणि निभावत आहे. !!