माझा लहापणापासूनच खूप सारा वेळ गावात, जंगलात , नदीत आणि आजूबाजूच्या परिसरात घालवल्यामुळे गावाकडची ओढ आणि आपुलकी खूप तीव्र आहे.
गावाकडचा हा निसर्ग असाच राहील का? हा प्रश्न नेहमीच पडायचा आणि जसं जसं गावातून मुंबई मध्ये आलो, काही वर्षांनी गावातील बहुतांश लोकं मुंबई मध्ये स्थायिक होऊ लागली, गावे ओस पडू लागली तेव्हा हा प्रश्न अजूनच दृढ होत गेला.
लोक म्हणतात कोकण म्हणजे स्वर्ग पण हा स्वर्ग असाच राहील का? आणि कोकण स्वर्ग आहे त्याचा मूळ कारण इथले लोक, त्यांची संस्कृती, कधी न संपणारा सागरकिनारा आणि वर्षानुवर्ष हिरवगार निसर्गाने नटलेले जंगल , हेच त्याचे मूळ कारण. मग ही संस्कृती, हा सागरकिनारा, हे जंगल राखणार कोण? ह्या कोकणचा राखणदार कोण होणार?
गावाची आपुलकी आणि ह्या प्रश्नांना न मिळालेलं उत्तर ह्याचीच शोध घेत माझ्या वाट्याला आला “देवराय” नावाचा उपक्रम. माझा मित्र आशिष आणि त्याची बायको ज्योती ह्यांनी मला ह्या उपक्रमाची माहिती करून दिली मग काय माझ्याप्रमाणेच निसर्गाचं वेड असलेल्या माझ्या बायकोला सांगितला आणि लगेचच आम्ही उपक्रमाला रजिस्टर केलं आणि निघालो कोकणकन्या एक्स्प्रेसने . दोन तिकिटापैकी एकच कन्फर्म झालं पण मग दोघंही एका सीटवर बसून पोचलो सावंतवाडी रेल्वे स्टेशन ला आणि तिथून तुळस, वेंगुर्ला येथील वाघेरी वाडीत पोचलो.
ठिकाण होतं, मांगर फार्मस्टे, वाघेरीवाडी. एक सुंदर मातीचे घर, जे तुम्हाला मातीशी एकरूप ठेवते तसेच तुम्हाला तिथल्या राहणीमानाने मातीवर ठेवते. कोकणी रानमाणूस ह्या यू टुब चॅनल चा सर्वेसर्वा प्रसाद गावडे ह्याने सुरू केलेल्या एका इको टुरिझम चे ते सेंटर आहे . प्रसाद इथे बाळू दादा च्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात राहून एक ” Minimalist LifeStyle” जगून आपल्या मातीचे, आपल्या निसर्गाचे आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण कसे करायचे ह्याचा कृतिशील मार्गदर्शन हया सेंटर मधून त्यांच्या संपूर्ण टीम मार्फत करत आहे.
ह्या दोन दिवसाच्या उपक्रमाने मला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच काही माहीत नसलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्याचं गोष्टी तुम्हा सर्वांना वाटाव्या हया हेतूने खाली मांडत आहे.
१. देवराई म्हणजे काय? हा प्रश्न मलाही पडला आणि त्याचं उत्तरही ह्या उपक्रमातून मी माझं शोधले . माझ्यासाठी देवराई म्हणजे ह्या पृथ्वीतलावर माणसाच्या रक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी जपलेले निसर्ग रुपी जंगल आणि त्यातील देवरुपी वृक्षे. जर आपण हे जंगल जपले तरच आपण स्वतःला जपू अन्यथा शेवट दूर नाही.
२. देवराई च्या टेहळणी मध्ये अजून एक नवीन नाव ऐकायला मिळाले आणि ते म्हणजे The Great Hornbill (मराठी मध्ये धनेश पक्षी म्हणतात). The Great Hornbill ह्याला जंगलचा शेतकरी म्हणतात. The Great Hornbill तुम्हाला फक्त नर आणि मादी अश्या जोडीमध्येच दिसतात आणि जीवनाच्या शेवटापर्यंत ते दोघं एकेमकांसोबत असतात. जेव्हा मादी गरोदर असते तेव्हा ती स्वतःला सहा महिने एका खोपिमध्ये बंद करून घेते आणि ही सहा ते सात महिने नर तिची सेवा करतो. तिच्या ६-७ महिन्यातील खाण्याचे डोहाळे हा नर च पूर्ण करत असतो.
३. ह्या उपक्रमाला आमची मिलिंद पाटील आणि विठ्ठल शेळके ह्या निसर्गप्रेमी सोबत ओळख झाली. जंगलं संवर्धन मध्ये दोघांचाही काम खूप मोठं आहे. फॉरेस्ट Restoration मध्ये खूप मोठं काम ते करत आहेत आणि त्यातील खूप सारे बारकावे त्यांनी आमच्या सोबत वाटले. माणसाची आणि झाडांची जीवनशैली ही कशी सारखी आहे ह्याचे खूप सारे उदाहरणे त्यांनी दिली. परदेशात झालेल्या एका रिसर्च नुसार EverGreen फॉरेस्ट मध्ये झालेल्या रिसर्च मध्ये हे आढळले की सगळ्या झांडाची मुळे ही एकमेकांना जोडलेली असतात आणि जमिनीची खाली त्याचं स्वतचं असा परिवार हा मुळांमार्फत जोडलेला असतो जो एकमेकांना ऊर्जा देत असतो. खूप वेगळं असे अनुभव मिलिंद दादाकडून ऐकायला मिळाले.
४. देवराई ची टेहळणी करताना आम्हाला एक वारूळ दिसले आणि तेव्हा एक गोष्ट नव्याने कळली. ती म्हणजे पृथ्वीवर माती निर्माण करणारं एकमेव प्राणी कोणी असेल तर ते आहे वाळवी. आता पर्यंत ऐकेलेली वाळवी बद्दल ची Positive गोष्ट.
५. मला वाटतं शेती हा आपला गाभा आहे, जर शेतकऱ्याने शेती नाही केली तर एक क्लिक वर घरी येणार अन्न कधीच आपल्या वाट्याला येणार नाही कारण अजूनतरी कोणतेही पीक जगातल्या कोणत्याही लॅब मध्ये किंवा कोणत्यातरी मशीन मध्ये उगवताना मी तरी नाही बघितलेले. ते फक्त आणि फक्त आपल्या मातीतच उगवते. आपल्या कोकणात सध्या अशी परिस्थिती आहे की आता सगळेच गाव सोडून मुंबईकडे पैसे कामावण्यासाठी येत आहेत आणि गावे ओस पडत आहेत. जर हे असच चालू राहिले तर शेती करणारं कोण? भविष्याचा विचार करता आपल्याला दोन्ही गोष्टींचा समतोल राखणारे एक नवीन मॉडेल बनवाव लागेल जे आपल्या येणाऱ्या पिढीला त्यांचं आयुष्य जगण्यासाठी मदत करेल.
६. सध्या कोकणात जागा घेऊन काजूची लागवड करण्याचे फॅड खूप ठिकाणी बघायला मिळते. ह्या उपक्रमात काही डोळे उघडणारे मुद्दे कळले ते म्हणजे काजूची झाडे जमिनीची धूप थांबऊ शकत नाही तसेच ती पावसाचे पाणीसुद्धा रोखू शकत नाही. एका टेकडीवर लावलेल्या फक्त काजूच्या झाडांमुळे अख्खी टेकडी पावसात कोसळली होती. तसेच काजूची झाडे लावताना त्यांची रोपे न लावता त्यांच्या बिया लावाव्या. रोपांच वय १०-१२वर्ष च राहते आणि नंतर ते नवीन पीक देईल ह्याची शाश्वती नसते. बिया लावलेली झाडे वर्षानुवर्षे टिकतात. जर तुम्ही काजूची लागवड करायचा विचार करत असाल तर वरील बाबींचा विचार नक्की करा.
७. तुम्ही जर कोकणामधील असाल तर तुमचं नक्कीच एक कुलदैवत असेल. माझा असं मत आहे की जर आपण थोडं निसर्गाच्या बाजूने विचार केलं तर आपल्याला कळेल की आपले कुलदैवत हे आपल्या निसर्गाचे राखणदार होते मग त्यांचं नाव काहीही असो. कोणासाठी तो काळभैरव असेल कोणासाठी वेतोबा तर कोणासाठी खंडोबा. ह्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात अनुभवल्या तरच पटतील. ( ह्यातील काही गोष्ठी तुम्हाला कांतारा ह्या चित्रपटात बघायला मिळतील). अजूनही कोकणातील शेतकरी शेतीच्या सुरुवातीला शेती सुरळीत व्हावी ह्यासाठी निसर्गरुपी देवाला राखण देतात.
९. ह्या उपक्रमातून मला एक गोष्ट मिळाली ती म्हणजे जर ही देवरुपी देवराई राहिली तर आपलं जंगल राहील आणि त्यामुळेच आपला अधिवास अधिक काळ राहील पण त्यासाठी ही देवराई आपल्याला राखावी लागेल आणि वाढवावी लागेल.
१०. आपल्याला जगण्यासाठी लागते अन्न, वस्त्र आणि निवारा. सध्याचं जगात हे वाक्य चुकीचे ठरू लागले आहे कारण आपल्याला जगण्यासाठी पाहिले लागते ते म्हणजे ऑक्सिजन. हे आपल्याला फ्री मिळते म्हणून आपल्याला कदाचित त्याची किंमत नाही कळत. ह्याची खरी किंमत दिल्ली मधील लोकांना विचारा ज्यांना ऑक्सिजन मास्क घालून फिरावं लागते आणि घरात एअर प्युरिफायर ठेवावा लागतो. हा ऑक्सिजन आपल्याला हा निसर्ग उपलब्ध करून देत आहे तर आपणही त्याची काळजी घेणे आवश्यक आहे नाहीतर जसे सध्या पाण्याचे टँकर फिरत तसे भविष्यात एअर प्युरिफायर टँकर फिरवावे लागतील.
११. प्रसाद गावडे ह्याने सुरू केलेले निसर्ग संवर्धनाचे विविध उपक्रम हे वाखण्याजोगे आहे. आपल्या गोड अश्या मालवणी भाषेत खूप सारे अनुभव, खूप सारी माहिती आणि खूप सारी ऊर्जा तो चालता बोलता वाटत असतो. आपला स्वतःच अस्तित्व कोकणातील निसर्गासाठी देताना आपण कोकणात राहून एक सुसेगाद आयुष्य कसे जगू शकतो ह्याचा मूर्तिमंत उदाहरण तो आणि बाळू दादा त्यांच्या साध्या जीवनशैलीतून जगाला दाखवत आहे. दोघांकडून खूप सारी ऊर्जा मिळाली आणि आपण आपली पुढील १० वर्ष व्यतीत केली पाहिजे ह्यासाठी दिशा दिली.
आज २३ जून आणि अजूनही पावसाची चाहूल नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याचं आगमन का नाही झाल त्याचं खर उत्तरही ह्या निसर्गाकडेच आहे.
मी सुरुवातीला एक प्रश्न उपस्थित केला की ह्या कोकणचा खरा राखणदार कोण?
मला वाटतं ह्या कोकणचा राखणदार आपणच आहोत आणि हे राखायच काम सुध्दा आपलेच आहे. आता हे राखायच कसं ते तुम्ही तुमचा ठरवायचं कारण इच्छा तेथे मार्ग आणि हो ह्या मार्गावर आणि वाटेवर आपली भेट होईल ही नक्की.
जर हा लेख तुम्हाला काही नवीन देऊन गेला असेल तर नक्की तुमच्या निसर्गमित्राला शेअर करा.