“चंद्रमुखी” ह्या कादंबरीवर आधारित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमा बघितला. लोककलेवर आधारित हा सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. लोककलेचे विविध पैलू ह्या सिनेमात पाहायला मिळतात.
मला ह्या सिनेमापलीकडे एक व्यक्तिरेखा खूप भावली आणि ती म्हणजे बत्ताशाची. बत्ताशा हा चंद्रमुखीचा मानलेला मामा. विनोदी अभिनेता समीर चौगुले ह्याने ही भूमिका साकारली आहे.
एक कलावंतीण म्हणून चंद्रमुखीचं आयुष्य थोडं गुलाबासारख गोड, नाजूक, सुंदर आणि आश्चर्यचकित करणारं तसेच थोडं आयुष्य हे गुलाबाच्या काट्यासारखे बोचरे, बोथट, बेभान आणि बेभरवशाचे होते.
बत्ताशाचं आयुष्य म्हणजे नदीच्या पात्रात पडलेल्या पानासारखं होते. कधी ह्या किंवा त्या दगडावर आदळत होते, कधी शांत आणि नितळ पाण्यात आरामात तरंगत होते , कधी मुसळधार पावसात इकडे तिकडे भरकटत होते तर कधी कडक उन्हात करपून जात होते. हे सगळं असूनही त्याचं मन आणि त्याची वृत्ती संपूर्ण हिरवीगार होती, पावसाळ्यातील हिरव्यागार माळरानासारखी.!!
त्याच्या संपूर्ण आयुष्यात तो फक्त त्याच्या माणसांसाठी उभा होता, कधी सोबत चालत होता तर कधी काहीही न बोलता पाठीशी होता पण ह्या प्रवासात न कोणती अपेक्षा होती न कोणाच्या गोड शब्दांची भूक. मला बत्ताशाची हीच भावना खूप भावली, आपल्या आयुष्य खडतर असताना, स्वतःकडे काहीही नसताना तो तिच्या मानलेल्या भाचीसाठी बिनशर्त पाठिशी उभा होता प्रसंग काहीही असो.
आपलं आयुष्य हे क्षणभंगुर आहे, आज आपण आहोत तर उद्या नाही पण आपल्या आयुष्यात बत्ताशासारखी माणसे आजूबाजूला नेहमीच असतात. कधी कधी आपण त्यांना ओळखतो तरी कधी कधी आपल्या नकळत ते आपल्या पाठीशी असतात.
तुमच्या आयुष्यात असा एक बत्ताशा नक्कीच असेल किंवा तुम्ही कोणाचा तरी बत्ताशा असाल.!
हा लेख त्या प्रत्येक हिरव्यागार मनाच्या बत्ताशासाठी आणि त्याच्यामागील भावनेसाठी.!
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
– अमित कोबनाक.