प्रिय बायको,
आज तु तुझ्या वयाच्या नव्या वर्षांत पदार्पण करत आहेस आणि त्यामधील मागील १२ वर्ष आपण एकत्र आहोत. आज जरा विचारांना मोकळं करावं असं वाटलं आणि मग विचार आला की का आपण एकत्र आहोत? किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपण जोडले गेलो आहोत?
थोडा विचार केला तेव्हा डोक्यात प्रकाश पडला आणि जाणवलं की आपण दोघं किंबहुना एक नवरा-बायको म्हणून दोन गोष्टींमुळे जोडलेले राहतो आणि त्या म्हणजे अपेक्षा आणि आशा. ह्याच दोन गोष्टींचा एक संवाद मांडत आहे.
अपेक्षा जी तू माझ्याकडुन करत असतेस,
आशा जी मी तुझ्याकडुन करत असतो.
अपेक्षा असते माझी की तू समजुन घ्यायला हवं,
आशा असते माझी की तू पण समजुन घ्यायला हवं.
अपेक्षा असते की तुला माझ्या मनातलं न बोलताच कळावं,
आशा असते की तुला माझ्या मनापलीकडचं कळावं.
अपेक्षा करते मी तुझ्याकडुन की मला पाहिजे त्या गोष्टींची तू पूर्तता करावी,
आशा करतो मी तुझ्याकडुन की माझ्याकडुन न पूर्ण होणाऱ्या गोष्टींमधील कारणे तू समजुन उमजून घ्यावी.
अपेक्षा करते मी की साथीदार म्हणून कधी तू माझ्या बरोबर तर कधी माझ्या पाठीशी असावं,
आशा करतो मी की साथीदार म्हणून कधी तू माझ्या बरोबर तर कधी माझ्या पाठीशी असावी.
अपेक्षा करते मी की तू समुद्राच्या लाटेसारखे उंच उंच प्रगत व्हावे,
आशा करतो मी की तू नदीसारखी शांत आणि गोड होऊन सर्वांना आपलेसे करावे.
अपेक्षा करते मी की मी रागवल्यावर तू मला मनवावं,
आशा करतो मी की मला तू रागावलेली आवडत नाही ते तुला कळावं.
नवरा – बायकोचं नातं हे असेच असते तिच्यासाठी तो अपेक्षा पूर्ण करणारा जादूगार आणि त्याच्यासाठी ती आशेची ऊब पेटत ठेवणारी किमयागार.!!
एक शेवटचं,
तू माझ्या खांद्यावर अपेक्षा ठेवत राहशील , मी तुझ्या डोळ्यातल्या आशेवर चालत राहील आणि आयुष्यात हाच खेळ आपल्याला जिंकवत राहील.!!