देवमाणूस..!!!

माझ्या आयुष्यातील बाबा नावाचे पर्व संपले. माझ्या बाबाने १ डिसेंबरला अचानक जगाचा निरोप घेतला..

माझ्या वयाची पहिली ७ वर्षे मी गावी आई आणि आजीसोबत घालवली. बाबा मुंबईला कामाला होता म्हणून बाबाची आणि माझी भेट जेमतेम ६ महिन्यातून एकदा होत असे. मी गावात कोणत्यातरी कोपऱ्यात खेळत असायचो आणि मला निरोप यायचा की तुझे बाबा आले आणि मी तिकडून धावत घरी पळायचो आणि त्याला जाऊन मिठी मारायचो. हीच एक लहानपणीची आठवण… मुंबईला कोणी जायला निघाले की आई माझ्या हातात एक चिठ्ठी द्यायची आणि मुंबईला जाणाऱ्या व्यक्तीला द्यायला सांगायची. आमची खुशाली आणि तिच्या भावनांचे गुपित त्या पत्रात लपलेलं असायचे.

गाव, आजी, आई आणि शाळा हे माझं दिनक्रम सुरू असताना बाबा मुंबईला मेहनत करून घर घेत होता आणि १९९५ साली आम्ही ठाणे येथे आमच्या नवीन घरात आलो.
मी तिसरीची परीक्षा गावी जाऊन देत असताना चौथीला बाबाने माझा ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला. नवीन दिनक्रम सुरू होता पण बाबा नक्की काय काम करत आहे हे कळत नव्हते पण नंतर हळू हळू कळले की तो काहीतरी जाहिरातीचे काम आवडीने करत होता. प्रचंड मेहनत आणि ध्यास घेऊन तो आमच्या चांगल्या भविष्यासाठी दिवस रात्र झटत होता. एक दिवस आईला एका काकांशी फोनवर बोलताना ऐकले होते की “भावजी, आमचे हे म्हणजे *’ देवमाणूस ‘* आहेत.” तेवढेच ते शब्द कानावर पडले, अर्थ नाही कळला पण ते शब्द मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तसेच होते.

बाबाच्या मेहनतीला फळ येत होते, त्याने सुरू केलेल्या व्यवसायाला लय सापडत होती , आलेल्या संधीचे तो सोने करत होता. सामाजिक, राजकीय आणि व्यवसाय ह्या तिन्ही मधे तो भरारी घेण्याच्या तयारीत होता. हे सगळे चालू असताना त्याची अर्धांगिनी आणि पाठीराखी त्याला सोडून गेली. सगळे काही परत शून्यापर्यंत येऊन पोहचले आणि पुढे कसं जायचे ह्या विचारात तो मग्न होता. स्वतःचं दुःख विसरून त्याने परत नवीन जिद्दीने आणि देवाच्या कृपेने व लाभलेल्या नवीन अर्धांगिनीच्या साथीने तो परत शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी सज्ज झाला. त्याची ती धडपड आणि भावनांची घालमेल एका कोपऱ्यातून मी शांतपणे टिपत होतो.

आमच्या चांगल्या भविष्यासाठी झटत असताना, बाबा आणि माझा सहवास तसा जास्त नव्हता. माझ्यानंतर काही काळासाठी आनंदचे हट्ट पुरवण्यात आणि मग दर्शनच्या मागण्या पूर्ण करण्यात त्याचा वेळ जात होता. घरात मोठा असल्याने मी मागच्या सीटवर बसून हे सगळं बघत होतो , कधी कधी त्या गोष्टीचा हेवा वाटला.. पण मग कालांतराने त्याची सवय झाली. माझ्यासाठी त्याच्यासोबत घालविलेला वेळ हा खूप मौल्यवान होता म्हणून तो मी नेहमी जपण्याचा प्रयत्न केला आणि काही गोष्टी मिळत नाही म्हणून त्याच्याकडे हट्ट करण्याचा मोह कधीच नाही झाला. सुरूवातीच्या काळात जो काही कमी सहवास लाभला तो मागच्या १०-१२ वर्षात खूप लाभला आणि ह्याच १२ वर्षात बाबाची नव्याने ओळख झाली. आईने दिलेली देवमाणसाची उपमा का होती त्याची प्रचिती मागच्या १२ वर्षात अनुभवली.

माझ्या बाबाचे एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे त्याला आमदार व्ह्यायचे होते.. ज्याची आशा त्याला २००९ साली निर्माण झाली होती. त्या आशेने त्यांना एक आत्मविश्वास दिला की मी आमदार होऊ शकतो. आमदार होण्यासाठीचा जणू काही त्याने ध्यासच घेतला होता. बाबांना लोकामध्ये वावरणे आणि लोकांची सढळ हाताने मदत करणे ह्याचा जणू काही छंदच लागला होता. २५-३० वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत त्यांनी असंख्य लोकांना, गावांना, संघटनांना आणि मंडळांना सगळ्या परीने मदत केली. बाबांची एक खासियत होती ती म्हणजे त्यांना एकदा भेटलेला माणूस परत त्यांना कुठे भेटला तर त्यांना त्या व्यक्तीचे पूर्ण नाव ठाऊक असायचे. बाबांनी त्यांचं आयुष्य हे लोकांसाठी ठेवले होते आणि लोकांबद्दलची आपुलकी त्यांना नेहमीच हवीहवीशी वाटणारी होती. लोकांसाठीच त्यांना आमदार व्हायचे होते आणि त्या स्वप्नाने त्यांना २००९ ते २०२४ पर्यंत फक्त आणि फक्त हुलकावणीच दिली. ज्या स्वप्नाला एवढे वर्ष उराशी बाळगले त्या स्वप्नांनेच त्यांना उराशी कवटाळले.

बाबाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द चालू असताना बाबा आम्हाला व्यवसाय कसा करायचा ह्याचे धडे देत होता. व्यवसायाचे धडे गिरवताना खूप संकटे आली पण ती संकटे चिकाटीने आणि जिद्दीने कशी पेलायची ही शिकवणी आम्हाला बाबाच्या अनुभवातून शिकता आली. *नेहमी मोठा विचार करा आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करा* ही त्याची शिकवण नेहमीच सोबत राहील.

देव पण किती हुशार असतो ना, एवढ्या वर्षात आमची एकच खंत होती आणि ती म्हणजे बाबाने आम्हाला वेळ द्यावा. जगाचा निरोप घेण्याच्या एक दिवस आधी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही घरातील सगळे उपस्थित असणे आणि बाबांनी आमच्यासोबत ती संध्याकाळ घालवणे हा निव्वळ योगायोग नव्हताच. जणू काही देवाने आम्हाला आमच्या देवमाणसासोबत वेळ घालविण्यासाठी दिलेली सुवर्णवेळ होती कारण तीच आमची शेवटची आठवण म्हणून आमच्या मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिली.

बाबा , एकच खंत मनात राहिली रे.
तुझ्या मनातले वादळ शांत करायचे राहून गेले रे,
तुझ्या उतरत्या वयात तुझी सेवा करायची संधी हुकली रे,
तुला एक शेवटची मीठी मारायची राहिली रे,
तुझ्या खुशीत येऊन झोपायची इच्छा अधुरीच राहिली रे,
तुला मी यशस्वी झालो हे दाखवायचे राहून गेले रे,
तुझ्याकडून माझ्या पाठीवर येणारी कौतुकाची थाप राहून गेली रे.
तुझा आणि माझा फक्त नजरेतून झालेला शेवटचा संवाद म्हणजे तू आराम कर, मी आहे.

बाबा, तुझं अवेळी जाणे आम्हाला हलवून गेले पण तू दिलेली अनुभवाची शिदोरी, आठवणीची साथ, जिद्द आणि चिकाटी हेच घेऊन आम्ही पुढील वाटचाल करत आहोत.

देवा, माझ्या देवमाणसाला सांभाळून घे आणि त्याला आराम करू दे हीच विनंती.


अमित कृष्णा कोबनाक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *