१०.१३ ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पकडली आणि नेमकी बसायला जागा मिळाली. हळूहळू गर्दी वाढली आणि काही वेळाने एक परिवार बच्चे कंपनी सोबत ट्रेन मध्ये चढला सोबत काही महिला पण होत्या. गर्दीतील महिलांची कसरत पाहता मी माझी सीट एका महिलेला दिली. आश्चर्यकारकरित्या पुढील काही वेळात मला बसायला विंडो सीट मिळाली तेव्हा एक विचार मनात येऊन गेला आणि तो म्हणजे की आपण जे काही नदिरुपी आयुष्यात टाकतो ते पुन्हा आपल्या वाट्याला येतच. हा अनुभव तुम्हा – मला सगळ्यांना आला असेल जसे की एखाद्या प्रवासात तुम्ही कोणाला आपली जागा बसायला दिली तरी पुढील प्रवासात तुम्हाला कोणीतरी नकळत जागा देते किंवा मिळते. हया विचारातूनच खालील ओळी सुचल्या आहेत.

आज तू कोणालातरी खुल्या मनाने जागा दे,
उद्या तुला कोणीतरी खुल्या मनाने जागा देईल.

आज तू कोणालातरी समजून घे,
उद्या तुला कोणीतरी समजून घेईल.

आज तू कोणालातरी मदतीचा हात दे,
उद्या तीच मदत कुठल्यातरी मार्गाने तुझ्याकडे येईल.

आज तू कोणावर तरी निस्वार्थ प्रेम कर,
उद्या तुझ्या वाट्याला निस्वार्थी माणसे उभी राहतील.

आज तू कोणासाठी तरी आवर्जून वेळ काढ,
उद्या तुझ्या वेळेला माणसे धावून येतील.

आज तू कोणासाठी तरी उभा रहा,
उद्या तुझ्या पाठी माणसाच्या रुपात परमेश्वर सुध्दा उभा राहील.

आज तू स्वेछेने एखाद्या गरजूला आर्थिक मदत कर,
उद्या तुझ्या गरजेला पैसा आपोआप उभा राहील.

आज तू कोणाच्या तरी चुका पोटात घे,
उद्या तुझ्या चुकांना कोणीतरी पोटात घेईल.

आज तू दोन्ही हाताने देशील
उद्या तूझे चार हात भरून येतील.!!

एक व्याप्त विचार केला तर आपले संपुर्ण आयुष्य हे देवाण आणि घेवाण ह्याने भरलेले आहे.
कधी विचारांची,
कधी शब्दांची ,
कधी प्रेमाची ,
कधी भावनांची आणि
सगळ्यात अधिक माणुसकीची.!!!

थोडे देत रहा आणि भरपूर येत राहील..!!!

-लेखक
आपलाच अमित कृष्णा कोबनाक.!!

4 Comments

  1. अप्रतिम लेखणी

  2. Nicely written 👌👌 keep it up💪🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *