गणित चुकायला लागले आहे..!!

प्रवास सुरू केला तेव्हा खूप काही करायचं होते,
प्रवासाने मध्यस्थ गाठल्यासारख वाटत आहे पण खूप काही करायचे राहिले असे वाटते,
अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!!

प्रवास सुरू केला तेव्हा सगळ्यांना आनंदी ठेवायचं होते,
प्रवासात पुढे जाताना कळले की सगळ्यांना आनंदी ठेवायच्या गडबडीत स्वतःचा आनंद हरवला आहे असे वाटते,
अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!!

प्रवास सुरू केला तेव्हा खूप काम करून खूप मोठे व्हायचे होते,
प्रवासात चालत असताना असे जाणवले की खूप काम करताना हृदयाचे ठोके चुकतात की काय असे वाटते,
अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!!

प्रवास सुरू केला तेव्हा देवाला सोबत रहा असे साकडे घातले होते,
प्रवासात धडपडत असताना असे दिसले की देवच नवनवीन पेपर देऊन माझीच परीक्षा का घेत आहे असे वाटते,
अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!!

प्रवास सुरू केला तेव्हा करियर नावाच्या छंदाने मनाला भुरळ घालून आवडीचे काम करायला मज्जा येईल असे वाटले होते,
प्रवासाचा अनुभव घेताना असे वाटले की काम काहीही असू दे पैसे किती कमवतो हेच महत्वाचे असते असे वाटते,
अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!!

प्रवास सुरू केला तेव्हा सगळ्या गोष्टी वेळेवर होतील असे वाटले होते,
प्रवासात धावताना कळले की आपल्या गाडीची वेळ एकतर लवकर निघून गेलेली असते किंवा आपल्याला उशीर झालेला असतो आणि आपल्या वेळेची वाटच बघावी लागते,
अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!!

हा लेख अश्या पिढीला समर्पित आहे जी सध्या आपल्या चाळिशीत, पन्नाशीत किंवा साठीत प्रवास करत आहे आणि अजूनही तुमच्या प्रवासाचे गणित जुळत नाही आहे.

ह्या लेखात एक निराशेची भावना अनुभवायला मिळेल आणि आशेचा एक शब्द लिहिलेला नाही कारण आशेला यायला आधी निराशा पचवावी लागेल असे मला वाटते. थोडी निराशा पण अधोरेखित व्हायला पाहिजे.

आपलाच अमित कृष्णा कोबनाक.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *