माझं आणि माझ्या बायकोचं आधीच ठरलं होते की आम्ही आमच्या मुलीला मातृभाषेतूनच शिक्षण द्यायचे. त्यासाठी आम्ही एकच मराठी शाळेचा फॉर्म भरला आणि तिथे प्रवेश घेतला. आज माझी मुलगी पहिली ला आहे. सुरुवातीपासून आम्ही तिला भिन्न आणि विविध गोष्टींचा अनुभव द्यायचा प्रयत्न केला. कधी मराठी नाटके बघितली, कधी मराठी सिनेमे बघितले, कधी गडावर घेऊन गेलो तर कधी शिमगा आणि गणपतीला आवर्जून घेऊन गेलो. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की तिला आता नाटके खूप आवडतात, गड – किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्याबद्दल तिला कुतूहल आहे, मराठी गाणी आणि गोष्टी ऐकणे,वाचणे तिला आवडू लागले तसेच तिचं गाव हे तिचे आवडते ठिकाण झाले आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला तिची मातृभाषा आपलीशी वाटायला लागली आहे.
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली, पुण्यात दुकानांनी मराठी पाट्या नव्हत्या लावल्या म्हणून काही राजकीय कार्यकर्त्यानी त्यांच्या पाट्यांची तोडफोड केली. मनात एक विचार घर करून गेला की ज्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या पाट्या फोडल्या त्यांच्यापैकी किती जणांची मुले मराठी भाषेमध्ये शिक्षण घेत आहेत?
फक्त पाट्या मराठी करून उपयोग होणार आहे का ? कारण पाट्या वाचणारा मराठी भाषिकच नाही राहिला तर त्या पाट्या वाचणार कोण?
मराठी मिडीयम की इंग्रजी मिडीयम हा विषय चर्चा करायला गेलो तर कधीच संपणार नाही कारण दोघांची शैली संपुर्ण वेगळी आहे. मुख्यतः चर्चा मातृभाषेतून शिक्षण घ्यावे की व्यावसायिक भाषेतून ह्या मुद्द्यावर व्हायला हवी. जेव्हा मातृभाषा आणि व्यावसायिक भाषा ह्यावर चर्चा होईल तेव्हा मातृभाषाच वरचढ होईल हा माझा अनुभव आहे.
मजेची बाजू अशी आहे की आज माझ्या मराठी भाषेला माझ्या मराठी लोकांनीच लहान करून ठेवले आहे आणि इंग्रजीला डोक्यावर घेऊन फिरत आहेत. माझ्या मुलीला जेव्हा आम्ही मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी पाऊल उचलले तेव्हा आमच्या दोघांच्या आई – वडिलांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला. पण हेच जेव्हा आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगितले तेव्हा खूप भिन्न वागणूक मिळाली. काही जण म्हणाले एकदा पुन्हा विचार करा, तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात, उद्या तुमची मुलगी तुम्हाला दोष देईल की तुम्ही तिला मातृभाषेतून शिक्षण घ्यायला लावलेत आणि काही जण आम्ही खूप मोठी चूक केली आहे असं जाणवून देत होते.
मी कुठेतरी ऐकले होते की ज्या मातृभाषेने तुम्हाला मोठे केले आणि एवढे सक्षम केले की आज तुमची आर्थिक वृद्धी होऊन तुमच्या पाल्याच्या इंग्रजी माध्यम ची भरमसाठ फी भरता येईल एवढे मोठे केले आहे पण आज तिच पिढी त्या शिक्षण संस्थेला कमी लेखत आहे ही आजची सल आहे.
जपान आणि चीन सारख्या महासत्ता त्यांच्या मातृभाषेत सगळा व्यवहार करतात. चीन मध्ये गूगल नाही कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेतील सर्च इंजिन बनवला आहे. आपल्याच देशात खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात. मग त्यात पंजाबी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली (२२ भाषांना अधिकृत भाषा म्हणून भारतीय राज्यघटनेत नमूद केले आहे) अश्या अनेक भाषा आहेत. गमतीची गोष्ट ही आहे की ही सगळी लोक एकत्र असताना त्यांच्या मातृभाषेतूनच संवाद साधत असतात आणि आम्ही मात्र मराठी असूनसुध्दा मराठीला बगल देऊन हिंदीचा खांदा पकडत असतो.
खरं सांगायला गेलो तर आमच्या पिढीला मराठी भाषेचा तसेच मातृभाषेचा न्यूनगंड आहे. त्यांना भीती आहे मराठी आता आउटडेटेड झाली आहे, मराठी आता मागे पडत चालली आहे आणि उद्या मराठी मुळे आपल्या पाल्याच शिक्षण कुठेतरी कमी होईल किंवा उद्या तो कुठेतरी मागे पडेल. ज्या भाषेचे ते स्वतः ब्रँड ॲम्बेसेडर आहेत तेच इंग्रजीच्या मार्केटिंगला खरं समजून आपले निर्णय बदलत आहेत.ज्या मार्केटिंगचा खर्च तुम्ही भरलेल्या फी मधूनच होत असतो. मराठी शाळा मार्केटिंग करताना मला तरी अजून दिसण्यात आले नाही.
माझं स्पष्ट मत आहे की आपल्या मुलांचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी आपल्या मुलांना सहज उपलब्ध झाली पाहिजे त्यासाठी कोणत्याही बँकेचे हफ्ते भरण्याची गरज नसावी आणि तुमचा पाल्य वर्गाबाहेर बसण्याचे कारण पैसा ही समस्या नसावी.
माझा विरोध इंग्रजी माध्यमाला नाही आहे. इंग्रजी माध्यम हे खूप प्रगत आणि व्यावसायिक दृष्ट्या सबळ आहे. माझा विरोध आहे त्या वृत्तीला जी हे म्हणते की फक्त इंग्रजी माध्यम मध्ये शिकलो तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि माझ्या मराठी भाषेला कमी लेखतात. माझी एकच अपेक्षा आहे की ज्या परीने आम्ही इंग्रजीला आदराने बघतो त्याच आदराने माझ्या मराठी भाषेकडे सुध्दा बघितले पाहिजे. जेव्हा ही मानसिकता बदलेल तेव्हा माझी मराठी अजून बहरेल.
शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे आपल्या पूर्वजांच्या इतिहासात डोकावून बघा, शिक्षण कोणत्या माध्यमात घेतले हे कोणीच बघितले नाही. ज्याला जिथे जायचं आहे तिथे तो पोहचतोच आणि ते सुध्दा स्वतःच्या जिद्दीने.
माझ एकच आवाहन असेल नवीन पालकांना की तुम्ही तुमच्या पाल्याला खुशाल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाका आणि त्या गोष्टीचा आम्ही खरच आदर करू पण तसेच कोणी तुमचे पालकमित्र आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेत टाकत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्या निर्णयाचा आदर करा.
चला मातृभाषा जपुया, माझ्या मराठी भाषेला आदराने वागवुया..!!!
–
लेखक,
आपलाच अमित कृष्णा कोबनाक.
अप्रतिम लेख👌मला अभिमान आहे दादा आणि वहिनींचा की ज्यांनी आजच्या या इंग्रजी माध्यमाच्या युगात आपल्या पाल्याला मराठी शाळेत घातलं. मराठी शाळेतील मुलांचं भविष्य उज्ज्वल होत,आहे, आणी राहील.👍
फार छान.
अप्रतीम 🚩
मराठीत शिक्षण घेऊन आपण संस्कारीत होतो. आपल्या संस्कृतीचा अभ्यास होतो. इतिहास भूगोल हे विषय मराठीत चांगल्या प्रकारे समजतात म्हणून किमान प्राथमिक
शिक्षण सर्वानी मराठीतूनच घ्यावे म्हणजे आपली पाल्य स्पष्टपणे आपले विचार जगासमोर मांडतील. चांगला निर्णय आहे.
Superb thought!
Good initiative twrds conserving our language and culture.
Proud of you 👏
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
प्रिय अमित,
तुमचे मराठी भाषा प्रेम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. मीही मराठी भाषेचा चाहता आहे. मीही माझ्या नातीला मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे.
धन्यवाद
अप्रतिम! खूप सुंदर लेख! खूप भावला. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लिहिलेला लेख सर्व मराठी भाषिकांनी जरुर वाचावा असाच आहे. कोणालाही न दुखावता आपली मते परखडपणे मांडण्याचा आपला प्रयत्न खूप छान. अमितजी आपले मनपूर्वक अभिनंदन!🎉🎊
अमित, नक्कीच मी तुमच्या मताशी सहमत आहे. माझी एकुलती एक मुलगी ही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहे. मराठी भाषेला आपण सगळे माय माऊली म्हणतो पण आज असं झालंय की माय मरो पण मावशी (हिंदी/इंग्रजी अशा भाषा) जगो.
जे इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना पाठवत आहेत त्यांना मुळात आमचा विरोध नाहीच आहे, पण मराठी भाषेत शिक्षण घेणं म्हणजे जुनाट काहीतरी किंवा पालकांची बेताची आर्थिक परिस्थिती हा काहींचा असणारा समज विघातक ठरतोय आणि त्यामूळे केवळ स्टेटस जपण्यासाठी अनेकजण हा धीट निर्णय घेताना घाबरत आहेत असे माझे मत आहे.
थ्री इडियटसचा डायलॉग आठवा काबिल बनो…..
त्यामूळे मातृभाषेत शिक्षण घेतल्याने काबील बनता येत नाही अस नक्कीच नाहीये.
खूप सुंदर , रेखीव आणि छान लेख आहे.खरोखरच इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देत असलेल्या मराठी पालकांना विचार करायला लावणारा हा लेख आहे.तुमचे खरच खुप मनपूर्वक अभिनंदन! तुमच्या लेखामुळे आम्हला ही एका मराठी पाल्याचे ,पालक असल्याचा अभिमान वाटतो. असेच सुंदर लेख लिहित जा, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.