आपण एकतर माणूस म्हणून चुकतो किंवा समोरच्याच काय चुकलं आहे हे पाहत असतो पण चुका होणे हे साहजिकच असते.

एक साधस अवलोकन आहे, आपले वर्तमान आयुष्य हे आपल्या मागील चार पिढ्यांनी चुकत – चुकत केलेल्या चुकांमुळे घडलेलं एक बरोबर होत गेलेले आयुष्य आहे.आपल्या एका पिढीने शिस्त आणि संस्कार एकत्र ठेवण्याची व्यवस्था केली, दुसऱ्या पिढीने घराची व्यवस्था केली, तिसऱ्या पिढीने उत्तम शिक्षणाची व्यवस्था केली आणि चौथी पिढी म्हणजे आपण. आता आपण आपल्या पुढच्या पिढीला समृध्दतेने आणि स्वत्रंतेने कसे जगता येईल याची व्यवस्था करत आहे.

ह्या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम राहिली आणि ती म्हणजे एका पिढीने केलेल्या चुका दुसऱ्या पिढीने बरोबर करत पुढचे आयुष्य बनविले आणि बनवत आहेत. सध्याच्या पिढीला एक गोष्ट जड जात आहे ती म्हणजे आपण कधी चुकलंच नाही पाहिजे ही भावना. वर्तमान पिढी ही भावना स्वतःसोबत आपल्या पुढील पिढीवरसुद्धा बिंबवत आहेत. माझ्या मते चुका करणे हा माणसाचा गुणधर्म आहे आणि त्यातून उभे राहणे हे त्याचं आयुष्य आहे.

‘चुका करणे वाईट असते’ की ‘बरोबर असणे चांगले असते’ हे मला नाही माहित म्हणून त्यामागच्या माझ्या भावना मी खाली सुचलेल्या ओळीत मांडायचा प्रयत्न केला आहे.

मला चुकायला आवडतं, चुकल्यावर खोड रबर ने खोडायला आवडतं.!!
चुकलेल्या माणसाला हजारो उपदेशांची शिदोरी असते, बरोबर माणसाच्या पाठी शहाणं माणूस पण उभ राहत नाही म्हणून मला चुकायला आवडतं,चुकल्यावर खोड रबर ने खोडायला आवडतं.!!

चुकलेल्या वाटा तुम्हाला नेहमीच अनपेक्षित ठिकाणी आणि भिन्न अनुभव देतात, बरोबर वाटा तर नेहमीच्याच ठिकाणी नेऊन सोडतात.
म्हणून मला चुकायला आवडतं,चुकल्यावर खोड रबर ने खोडायला आवडतं.!!

एखादी गोष्ट चुकल्यानंतर बरोबर करण्यासाठीचा आटा – पिटा खूप काही शिकवतो पण मला एखादी गोष्ट बरोबर वाटताना ती चूक होती ह्याची जाणीव झाल्यानंतरचा आटा – पिटा डोकं उठवतो.
म्हणून मला चुकायला आवडतं,चुकल्यावर खोड रबर ने खोडायला आवडतं.!!

आजचा एखादा चुकलेला प्रयत्न अपयशाचा दगड बनून पाठीवर बसतो पण तोच चुकलेला प्रयत्न मैलाचा दगड होऊन यशाची नवीन परिभाषा होतो.
म्हणून मला चुकायला आवडतं,चुकल्यावर खोड रबर ने खोडायला आवडतं.!!

शाळेत असताना चूक की बरोबर च्या उत्तरांनी मार्क वाढवले आणि सध्याच्या जीवन प्रवासात चूक की बरोबर च्या उत्तरांनी अनुभव वाढवले!!

एक विनंती वर्तमान पिढीला , बरोबर होणे सोप्पे नसते तसेच चुकांना सुधारणे अवघड नसते म्हणून चुकत रहा , बरोबर होत रहा आणि चुका करताना झालेल्या टोचणाऱ्या भावनांना खोडरबरने खोडत रहा.

– लेखक,
आपलाच अमित कृष्णा कोबनाक.

One Comment

  1. Apratim

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *