गाव – शहर (गोष्ट दोन जिवलग मित्रांची).

जर तुम्ही काही वर्षांपूर्वी तुमचं गाव सोडून शहरात राहायला आला असेल तर ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडेल.

ही गोष्ट आहे एका शांत गावाची आणि चंचल शहराची.

एक भलं मोठं जंगल होत त्यात दोन जिवलग मित्र राहत होते.

एकाचे नाव होते गाव आणि दुसऱ्याचे नाव होते शहर.

गावाचा स्वभाव एकदम शांत, समाधानी होता आणि त्याउलट शहराचा स्वभाव हा चंचल आणि महत्वाकांक्षी होता.

गाव आपला दैंनदिन दिनचर्येतून मेहनतीनं काम करून आपला पोट भरत होता पण शहर नेहमी काहीतरी नवीन करायच्या प्रयत्नात असायचा आणि सततच्या नवनवीन कल्पनांच्या विचारात मग्न राहत होता.

एक दिवस विकास, सिमेंट, तंत्रज्ञान त्या जंगलात आले होते तेव्हा त्यांची मैत्री गाव आणि शहराशी झाली.

एका संध्याकाळी गाव, शहर, विकास, सिमेंट, तंत्रज्ञान गप्पा मारत बसले होते तेव्हा विकास म्हणाला की आपण तंत्रज्ञान आणि सिमेंट च्या मदतीने खूप काही नवीन प्रकल्प करू शकतो. ह्यावर गाव म्हणाला की माझा इथले आयुष्य समाधानी आहे त्यामुळे मला काही ह्यामध्ये रस नाही पण शहर मात्र खूपच खुश झाला होता, त्याला असेच काहीतरी करायचे होते. विकास म्हणाला की आपल्याला जे काही करायचे आहे ते गावापासून लांब जाऊन करावे लागणार आहे म्हणजे गाव आणि शहर च्या जिवलग मैत्री मध्ये आता अंतर येणार होते. गाव शहराला समजावत होता की तू नको जाऊ कारण मला नाही करमणार तुझ्याशिवाय पण शहराला विकास, सिमेंट आणि तंत्रज्ञानाने भुरळ घातली होती.

निरोपाचा दिवस ठरला, गावाचं अंतकरण भरून आले होते आणि डोळे ओले झाले होते. शहराला पण वाईट वाटत होते पण महत्वाकांक्षेपुढे त्याला काहीच दिसत नव्हते. गाव आणि शहराची शेवटची गळाभेट झाली , गाव म्हणाला तुझी खुशाली पत्राद्वारे कळवत रहा आणि काळजी घे. शहराच्या सांगण्यावरून जंगलातील काही महत्वाकांक्षी झाडे आणि शहर निघाले, विकास, सिमेंट आणि तंत्रज्ञानासोबत नवीन जंगल विकसित करायला.

वर्षामागून वर्षे लोटली , शहर खूप विकसित झाला, अधून मधून तो गावाला आपली खुशाली कळवत होता. कालांतराने पत्र बंद झाली कारण तंत्रज्ञानाने त्याला मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध करून दिले होते. आता शहराकडे सगळं काही होतं पण वेळ मात्र नव्हता त्यामुळे दोघा मित्रांचा संपर्क काहीसा कमी होत गेला.

विकासने शहर, सिमेंट आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अजून नवनवीन शहरांना विकसित केले. सिमेंट ने रस्ते आणि घरे बांधली. तंत्रज्ञानाने नवनवीन उद्योग, वैद्यकीय सुविधा, वाहतूक सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून दिला. हे सगळं घडत असताना शहराने कर्ज, त्राण ,असुक्षितता अशा विविध व्याधी पण स्वतःवर ओढून घेतल्या.

शहरासोबत आलेल्या काही महत्वाकांक्षी झाडे विकासाकडे खूप आशेने बघत होती की आम्हाला पण काहीतरी नवीन जीवन जगायला मिळेल पण त्यांची घोर निराशा झाली. विकास, शहर, तंत्रज्ञान आणि सिमेंट ने त्यांचा फक्त त्यांच्या सोयीनुसार वापर करून घेतला. काहीजण सिमेंटच्या जंगलात अडकून पडले, काही जण रस्त्यांच्या कडेला उभे राहिले, काहीजण बागेच्या चार भिंतीत कोंडले गेले. एक बघितलेले वास्तव म्हणजे गावातील झाडाच्या खोडाला लोक पूजतात तर शहरात त्याच खोडावर लोक थुकतात. प्रत्येक झाड गावा सोबत राहून मुक्तपणे मिळणारी हवा सोडून आता शहराने दिल्या प्रदूषणात आपल उरलेले आयुष्य घालवत आहे. गावाकडची त्याची वाट कधीच बंद झाली आहे.

ह्या सगळ्या वर्षात गावाचं काय झालं ह्याचा कोणी विचारच नाही केला.

गाव आपला सकाळी लवकर उठून शेतात काम करून, मोकळी हवा घेऊन एक समाधानी आयुष्य जगत आहे.
तो कधी कोणाच्या दुःखात तरी कधी कोणाच्या सुखात आपला वेळ घालवत आहे. ना कोणाकडून कसली अपेक्षा ना कोणती आशा पण माणुसकी आणि प्रेम भरभरून कमवत आहे. एकच चिंता आहे त्याच्या मनात , ती म्हणजे त्याच्यासारख्या असंख्य गावांना आता कुलुपे लागली आहेत, शाळा बंद पडत चालल्या आहेत, जंगलाच्या पायवाटा नाहीश्या झाल्या आहेत आणि काही ठिकाणी विकास, सिमेंट आणि तंत्रज्ञानाने त्याचं गावपण नाहीसे करायला निघाले आहेत.

शहराला आपला जिवलग मित्राचा विसर पडला आहे पण गाव मात्र आपल्या मित्राची रोज आठवण काढत असतो. दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत पण कधी कधी शहर वाट चुकून गावाला भेटायला येत असतो. आता गाव थकला आहे किंवा असा समजा तो आता शेवटची घटका मोजत आहे.

गावाची आणि शहराची पुन्हा भेट होईल का? परत शहर गावा सोबत राहायला येईल का? परिस्थिती आणि प्रश्न दोन्ही गंभीर आहे.

ह्याचा विचार आता शहरात राहणाऱ्या व्यक्तीने करणे गरजेचा आहे बघा मग थोडा तुम्हीपण विचार करून..!!!

लेखक,
आपलाच अमित कोबनाक.

2 Comments

  1. Apratim

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *