आम्ही संघर्ष पुरुष.!!
नुकताच आपण टी २० विश्वचषक जिंकला आणि भारत विश्वविजेता झाला. विश्वविजेता होण्याचा खूप वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला आप-आपल्या भावना अनावर झाल्या आणि खूप वर्षांनी प्रत्येक संघर्षमयी पुरुषाला आनंददायी अश्रुंनी रडताना बघितले, काही मैदानावर रडत होते, काही स्टेडियम मध्ये रडत होते तर काही टीव्ही च्या स्क्रीन समोर बसून रडत होते.
खूप वर्षांचा संघर्ष संपला असा अनुभव त्या प्रत्येक माणसाला आला ज्याने हा संघर्ष स्वतः बघितला आहे किंवा स्वतः अनुभवला आहे. कुठेतरी असे वाटत होते की हे सगळेजण आपल्याच भावना मैदानावर व्यक्त करत आहेत.
हे सगळे बघत असताना मला हे जाणवले की मैदानावर खेळणारा प्रत्येक खेळाडू हा तुमच्या आमच्यासारखा संघर्षाने भरलेल्या माणसाचे प्रतिनिधित्व करत होता आणि तोच संघर्ष तो त्या अश्रुतून बाहेर येत होता. ह्याच संघर्षातून प्रेरित होऊन त्या प्रत्येक खेळाडूचा भाव वेचायचा प्रयत्न खाली दिलेल्या ओळींतून मी करत आहे. हा भाव संघर्षाचा आहे आणि तो तुमचा आणि माझा देखील असू शकतो. वाचताना तुम्हाला तो तुमच्या आयुष्याशी जोडेल किंवा त्या खेळाडूंच्या आयुष्याशी जोडेल.
रोहित शर्मा म्हणजे असा व्यक्ती ज्याने आयुष्यात छोट्या मोठ्या खूप साऱ्या गोष्टी स्वतःच्या हिमतीवर मिळवल्या आहेत पण मनात असे एक अधुरे स्वप्न आहे ज्याची आर्तता आणि उत्सुकता त्यालाच माहीत आहे. हे अधुऱ्या स्वप्नाने त्याला खूप वेळा हुलकावणी दिली आहे आणि आज जेव्हा ते स्वप्न सत्यात उतरले तेव्हा मात्र त्या भुमातेला ओरडुन ओरडुन सांगावेसे वाटले की मी जिंकलो, मी जिंकलो..!!!
हार्दिक पांड्या म्हणजे असा व्यक्ती ज्याला खूप साऱ्या चांगल्या संधी समोरून आल्या आणि त्या संधीचे त्याने खरच सोने केले. एकामागून एक यश तो मिळवत गेला आणि त्याची एक झिंग डोक्यात गेली. हे करताना त्याने त्याच्या लोकांना गृहीत धरायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यातील लोक त्याला अंतर देऊ लागली. यशाच्या शिखरावर असताना जवळच्या लोकांनी त्याची साथ सोडली आणि आयुष्याला गृहीत धरत असताना एक सणसणीत चपराक बसली. आयुष्याने परत त्याला जमिनीवर आणले आणि स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी त्याला दिली. ह्यावेळेस त्याने ह्या संधीची चांदी (वर्ल्डकपची ट्रॉफी) केली. जिथे गोष्टी आपल्या हाताबाहेर जात आहे वाटत होते (शेवटची ५ षटके) तिथे तो यशाचा शिल्पकार झाला. ज्या आयुष्याने त्याला आभाळ दाखवले त्याने त्याला जमिनीवर आणून आनंदाश्रूची चव खायला लावली. When Life hits you Hard, Show them Hard-ik Pandya..!!!
रिषभ पंत म्हणजे असा व्यक्ती ज्यासाठी आयुष्यातील सगळे निर्णय योग्य ठरले आणि त्याच स्वतः चं करियर एकदम उज्ज्वल असणार आहे असे दिसत होते. अचानक एक अपघात होतो आणि तो मृत्यूच्या दाढेतून वाचून बाहेर येतो. एक उज्ज्वल दिसणारे भविष्य , अचानक संपूर्ण अंधारात जाते. आता सगळे संपले असे जग म्हणत असताना तो मात्र धीट असतो की मी उभा राहणार. संयम, चिकाटी आणि स्वतःच्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर तो पुन्हा उभा राहतो. अंधारात गेलेले भविष्य तो त्याच्या मेहनतीने उज्ज्वल करायला सज्ज आहे असा अनुभवच तो इतरांना देतो.
सूर्यकुमार यादव म्हणजे असा व्यक्ती जो कुठेच नसतो. ज्या वयात तरुण आपलं करियर आणि आपलं आयुष्य सेट्टल करायला सुरु करत असतात तिथे त्याचे आयुष्यात काय होईल हेच माहीत नसते. तो एक गोष्ट नित्यनेमाने करत असतो आणि तो म्हणजे दररोज एक प्रामाणिक प्रयत्न. देव नेहमीच अश्या लोकांची परीक्षा घेत असतो आणि तरीही तो त्यांच्या पाठीशी ठाम उभा असतो. योग्य वेळी त्याला संधी मिळते (वयाच्या २९ व्या वर्षी) आणि त्या संधीच तो स्वतःच एक वेगळेच आकाश (SKY) उभ करतो. जेव्हा सगळेच संपले असे वाटत होते तेव्हा हाच सूर्या आकाशात झेपाऊन अस काही करतो (तो एक झेल) की भारत जगज्जेता होतो. एक प्रामाणिक आणि मेहनती माणसाची साथ देव कधीच सोडत नाही ह्याचा प्रत्यय येतो.!!
विराट कोहली म्हणजे असा व्यक्ती ज्याने आयुष्यातील मैदानावरच्या प्रत्येक परीक्षेत अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली असते. जिद्द, मेहनत आणि अनन्य साधारण शैलीच्या जोरावर त्याने आपली वेगळीच छाप पाडलेली असते. जेव्हा जगज्जेता होण्याच्या स्पर्धेत सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडेच असतात पण तो सपशेल अपयशी ठरतो. अक्षरशः एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल पाच ते सहा वेळा जगज्जेता होणार अशी हुलकावणी हे आयुष्य त्याला दाखवते. आता वयाच्या अश्या उंबरठ्यावर तो उभा असतो की आता नाही तर कधी नाही. स्पर्धेच्या सुरुवातीपासून अपयश त्याची पाठ सोडत नसतो पण तो टिकून राहतो. सगळ्या टिकांना सामोरे जातो आणि ज्यावेळेस खरचं उभा राहायची वेळ येते तेव्हा ठाण मांडून उभा राहतो. जगज्जेता झाल्यावर मागील हुलकावणी दिलेले सगळे पराभव अश्रुंच्या मार्गे बाहेर पडत असतात. प्रयत्नांती परमेश्वर ह्याची प्रचिती येते.
राहुल द्रविड म्हणजे असा व्यक्ती जो दृढ निश्र्चयी, मेहनती, सयंमी आणि शांत स्वभावाचा. हा असा व्यक्ती ज्याचा एकाच गोष्टीवर नितांत विश्वास आणि ती म्हणजे त्याची प्रामाणिक दैनंदिन मेहनत. यश संपादन करण्यामध्ये खारीचा वाटा असताना समोर कधीच येणार नाही आणि पराभवात टीमची ढाल व्हायला कधीच मागे पुढे पाहत नाही. आपली पिढी जिला यश संपादन करण्याची खूप घाई असते आणि त्यासाठी कधी कधी आपले तत्वे सुध्दा बाजूला ठेवतात तिथे ह्या माणसाने २००७ चा वर्ल्डकपच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तब्बल १७ वर्षे मेहनत घेतली आणि त्याच जमिनीवर चषक हातात उंचावताना त्याच्या चेहऱ्यावरील संघर्षमयी भावना मनाला अस्सिम आनंद देणारी होती. त्याची भावना आणि सध्या संघर्ष करत असलेल्या पुरुषांची भावना ह्यांच्याशी एकरूप झाली असाच काहीसा अनुभव आला.
संघांतील प्रत्येक खेळाडूचा भाव हा स्टेडियममध्ये असलेल्या आणि टी व्ही समोर बसलेल्या प्रत्येक पुरुषाचा संघर्षानंतरचा आनंद दाखवत होता. माझी एकच विनंती आहे त्या प्रत्येक संघर्ष पुरुषाला जो मेहनत करून आपल्या आयुष्याची आणि संसाराची घडी बसवत आहे की तुझ्या हाती यश नक्कीच येईल , तू तुझी प्रामाणिक मेहनत अशीच सुरू ठेव. तुझी यशोगाथा वरील दिलेल्या संघर्ष पुरूषांसारखी असेल किंवा तुझी स्वतः ची यशोगाथा सगळ्यांपेक्षा वेगळी असेल.!!
एकच सांगेन ” तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची.”
ह्या लेखात लिहिलेला वरील भाव त्या प्रत्येक क्रिकेट रसिकांसाठी आणि त्या प्रत्येक संघर्ष पुरुषासाठी समर्पित..!!!
-आपलाच,
अमित कृष्णा कोबनाक
खूप छान, as always!
Thank You Sumit.!!
Khupach chaan amit… ek ek shabd vichar karnyasarkha aahe…. dhanywad … asech lihit raha…. shubheccha
Thank You Saheb.!!
Khupda vyakt hon jamat nahi Ani kahi Vela itak bharbharun bolavas vatat…hya Don binduchya madhye zulnara prani …purush…Ani ti zulnari bhavana shabdat Kay mandlis rav laybhari
Thank You Paddya.!!